विवाहितेला मारहाण,8 जणाविरोधात‌ गुन्हा दाखल

जत,संकेत टाइम्स : खैराव(ता.जत) येथील विवाहितेस तुझ्या वडिलांचे आजारपण आहे तू इथे राहू नकोस, रहायचे असेल तर वडिलांची जमीन विकून दहा लाख रुपये घेवून ये मगच इथे नांदायचे असे म्हणत विवाहितेस जबर मारहाण करून घरातून हाकलून दिल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील पती सागर श्रीमंत सांगोलकर, सासू सुशीला श्रीमंत सांगोलकर, सासरा श्रीमंत विठोबा सांगोलकर, संगीता सचिन सांगोलकर, सतीश श्रीमंत सांगोलकर, विद्या सतीश सांगोलकर व विठ्ठल हणमंत सांगोलकर या आठ जणांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे 


विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे की, जत तालुक्यातील खैराव येथील मुलीचा मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील सागर सांगोलकर याच्याशी विवाह झाला. सागर हा मुंबई येथे कामास असल्याने तो अधूनमधून येत असे. लग्नाच्या दिवसापासून ताटाला वाटकणी का लावली नाही म्हणून वाद सुरू आहे. 


लग्नादिवशीच सासरच्या लोकांनी पाच हजार रुपये हट्ट करून घेतले. तेव्हापासून आजतागायत त्रास सुरू आहे. देवदर्शनाला गेल्यानंतरही दिर सचिन याची पत्नी संगीता हिस का सोबत आणले नाही म्हणून पती सागर याने शिवीगाळ केली व माझ्यासोबत देवदर्शन केले नाही. 
माझे वडील हे आजारी असतात. त्यांच्या आजारपणाचे टोमणे मला देत तसेच काहीही कारण काढून शिवीगाळ, मारहाण व उपाशी पोटी ठेवल्याचा प्रकार सुरू आहे. माझ्या वडिलांची खैराव येथे शेत जमीन आहे ती विकून दहा लाख रुपये आण नाहीतर येथे रहायचे नाही म्हणून मला शिवीगाळ, मारहाण करून घरातून हाकलुन दिले आहे.संशयित आठ जणांपासून आपल्या जीवितास धोका असल्याचेही पीडित विवाहितेने म्हटले आहे.