सांगली जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लसीकरण 377 केंद्रांवर 2300 कर्मचारी कार्यरत

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढता असला तरी त्याला अटकाव करण्यासाठी लसीकरणही मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. जिल्ह्यात आज अखेर सुमारे 4 लाख 20 हजार नागरिकांना लसिकरण करण्यात आले आहे. यासाठी 377 इतक्या लसिकरण केंद्रावर 2300 इतके अधिकारी / कर्मचारी अव्यहतपणे काम करत आहेत.सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड -19 चे लसीकरण सुरु करण्यात आले. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. यानंतर दिनांक 01 फेब्रुवारी 2021 पासून फ्रंटलाईन वर्कर यांचे (महसूल, पोलीस, सफाई कामगार व कोविड मध्ये प्रत्यक्ष काम करणारे) लसीकरण सुरु करण्यात आले. दिनांक 1 मार्च 2021 पासू 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तसेच दिनांक 1 एप्रिल 2021 पासू 45 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे.

सध्या सांगली जिल्ह्यात 377 लसीकरण केंद्रे सुरु असून याठिकाणी जवळपास 2300 वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच स्वयंसेवक कार्यरत आहेत. आज अखेर 4 लाख 19 हजार 944 लसीकरण करण्यात आलेले आहे. दररोज सरासरी 19 ते 20 हजार लसीकरण होत आहे.