जतेत बसस्थानकात दिव्यांगांसाठीच्या सुविधांचा अभाव

जत,प्रतिनिधी : 3 डिसेंबर सर्वत्र जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अलिकडच्या काळात दिव्यांग आपल्या स्वत:च्या हक्काविषयी जागृत होत आहेत. तरीही आजही अनेक बाबतीत दिव्यांगांना जगण्याच्या हक्काबरोबरच अनेक शासकीय कार्यालयात व परिसरात अपेक्षित अशा सुविधा मिळत नाहीत. विशेष करुन बसस्थानकात दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.जत तालुक्यातही दिव्यांग बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दिव्यांग एस.टी.च्या प्रवासी सवलतीचा लाभ घेतात. हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात बसस्थानकात मात्र त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आजही मिळत नसल्याचे दिसून येते. बसस्थानकात आल्यानंतर पायांनी अपंग असणाऱ्या दिव्यांगांना विशेष करून ये-जा करण्यासाठी "रॅम्प" ची गरज असते. अनेक प्राथमिक, माध्यमिक, ज्यु.कॉलेज व महाविद्यालयात अशाप्रकारच्या पायऱ्या विरहित रैम्प बांधण्यात आलेले आहेत. त्याचधर्तीवर बसस्थानकातही व्हिल चेअर किंवा पायांनी अपंग असणाऱ्या व्यक्तींना सहजा-सहजी बसस्थानकात येता यावे यासाठी रँम्प बांधणे गरजेचे आहे.शौचालय व लघुशंकेसाठी जाताना दिव्यांग बांधवांना विशिष्ट प्रकारच्या रॅम्पची गरज असते. त्यामुळे याही ठिकाणी दिव्यांग बांधवांना चांगल्या सुविधा देवून दिव्यांग बांधवांची होणारी कुचंबना दूर करणे अत्यंत गरजेचे असल्याने तात्काळ एस.टी. महामंडळ प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.