चंद्रकांत पाटलांनी 'एसटी- बी' प्रवर्गाची कागदपत्रे सादर करावीत | विक्रम ढोणे यांचे आव्हान ; जतमध्ये होणार निषेध आंदोलन

जत,प्रतिनिधी  : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंधरा दिवसांपुर्वी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात बोलताना धनगर समाजासाठी 'एसटी- बी' आरक्षणाची तरतूद केल्याचे विधान केले आहे. मात्र यासंबंधीची माहिती महाराष्ट्रात इतर कोणाला नाही. 
त्यामुळे चंद्रकात पाटलांनी यासंबंधीची कागदपत्रे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावीत, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
यासंबंधाने आम्ही चंद्रकांत पाटील यांना सात दिवसांची मुदत देत आहोत. या मुदतीत त्यांनी आरक्षणाच्या तरतुदीसंबंधी कागदपत्रे जाहीर करावीत,अन्यथा जत तहसील कार्यालयासमोर सोमवार,दि.14 डिसेंबर 2020 रोजी निषेध आंदोलन करण्यात येईल, असे ढोणे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. विक्रम ढोणे म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात धनगर समाजाची घोर फसवणूक झाली. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या नेत्यांनी 
समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची घोषणा फडणवीस करणार होते, मात्र फडणवीसांनी हा प्रश्न कधीच 
सुटणार नाही, अशी व्यवस्था करून टाकली. समाजात भ्रम निर्माण करणाऱ्या घोषणा केल्या, शिवाय दलाल नेत्यांकडून समाजाची दिशाभूल करण्याची व्यवस्था केली. धनगरांना एसटी आरक्षण मिळण्यासाठी फडणवीसांनी एकही पाऊन टाकलेले नसताना चंद्रकांत पाटील पुर्वीपासून फडणवीसांनी धनगर आरक्षणप्रश्न सोडवला असे सांगत आहेत.


 यावरून भाजपमध्ये विरोधाभास एवढा आहे की फडणवीसांनी कधी आरक्षण दिल्याचे म्हटले नाही, शिवाय भाजपमधीलच धनगर नेते सत्ताबदल झाल्यानंतर आरक्षणासाठी दिखाऊ आंदोलने करत आहेत.धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळालेले नाही, हे सर्वांना माहित असताना चंद्रकांत पाटील मात्र पुर्णपणे खोटी, भंपक विधाने करत 
आहेत. ते धनगर समाजाला वेडं समजत आहेत. त्यांनी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने 21 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यात झालेल्या भाजप ओबीसी सेलच्या मेळाव्यात अकलेचे तारे तोडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी 'एसटी- बी' प्रवर्गाची व्यवस्था केली, मात्र मुर्खांना हे समजत नाही, असे विधान त्यांनी टीकाटिप्पण्णी करताना केले. वस्तुत: अशी कोणतीही व्यवस्था फडणवीसांनी केल्याचे महाराष्ट्राला माहिती नाही.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनीच यासंबंधीची कागदपत्रे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर 
करावीत, असे आमचे आवाहन आहे. चंद्रकांत पाटील यांचा धनगर समाजाप्रतीचा आजवरचा अनुभव चांगला नसलातरी आम्ही त्यांना पुरावे 
सादर करण्याची संधी देत आहोत. त्यांना पुरावे देता आले नाहीत तर त्यांचे खोटारडेपण आपोआप सिद्ध होणार आहे. तसे आम्ही जाहीरही 
करणार आहोत. चंद्रकांत पाटील हे मतांसाठी घाणेरडे राजकारण करत असल्याने त्यांना उघडे पाडणार आहोत. त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या 
विधानाचा निषेध म्हणून आम्ही जत तहसिल कार्यालयासमोर सोमवार, दि. 14 डिसेंबर 2020 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.