जतच्या पुरवठा अधिकाऱ्याला बडतर्फ करा ; संजय कांबळे

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बिळूर व बनाळी येथील रेशनच्या काळाबाजार प्रकरणी जत पुरवठा विभागाचे अधिकारी व त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ अधिकारी यांना बडतर्फ करावे,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हापुरवठा अधिकारी यांच्याकडे केली आहे. 
त्यानी निवेदनात म्हंटले आहे की, सरकारने गोरगरिब जनतेला मोफत व अल्पदरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी स्वस्तधान्य दुकाने चालू केली आहेत. या स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्यातून गोरगरिब लोक आपली उपजीविका भागवतात.स्वस्तधान्य दुकाने हीच गोरगरिबासाठी सहारा असल्याने ते यावरच अवलंबून असतात.अशी परिस्थिती असताना त्याच प्रमाणे शासकिय धान्य गोदामातून स्वस्तधान्य दुकानांसाठी शासकिय वाहनाने दुकानदारांच्या मागणीप्रमाणे धान्याचा पुरवठा करण्यात येत असतो.यानंतर हे स्वस्तधान्य अंत्योदय,बिपीएल व केसरी शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या प्रमाणात वाटप करण्यात येत असते. 

हे धान्य गोरगरिबांना कशा प्रकारे वाटप होते,यांची उदाहरणे अनेकवेळा समोर आली आहेत. स्वस्तधान्य दुकानदार काळाबाजार करतात हे पाहाण्याची जबाबदारी पुरवठा निरिक्षक यांची असतानाही ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याने स्वस्तधान्य दुकानदारांवर कोणाचे नियंत्रण राहीलेले नाही.त्यामुळे ते बेलगाम झाले असून गोरगरिब लोकांसाठी आलेले स्वस्तधान्य ते गोरगरिबांना न वाटप करता ते काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी पाठवत असतात.
ग्रामीण भागात गावच्या पुढा-याकडे किंवा त्याच्या नात्यातल्या व्यक्तीकडे स्वस्तधान्य दुकानाचा परवाना असल्याने गोरगरिब जनता स्वस्तधान्य दुकानाबाबत तक्रार ही करू शकत नाही.त्यातूनच एकाने जरी तक्रार करण्याचे धाडस केले तरी या गावपुढा-याकडून तसेच त्याने पाळलेल्या गावगुंडाकडून तक्रारदाराला धमकी देवून त्याच्यावर दबाव आणला जातो. असे प्रकार वर्षानुवर्ष चालू आहेत.
 त्यामुळे ग्रामीण भागातील स्वस्तधान्य दुकानातून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार सुरू आहे। या प्रकाराला सर्वस्वी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांना काळाबाजार प्रकरणी पाठीशी घालणारे महसुलचे वरिष्ठ अधिकारी हेच जबाबदार असून हे अधिकारी व कर्मचारी महिना अखेरीस प्रत्येक स्वस्तधान्य दुकानातील विक्री केलेले धान्य, शिल्लक राहीलेले धान्य व धान्य घेणारेची माहिती याची चौकशी केली तर खरे कारण उजेडात येईल व रेशन दुकानातून काळ्याबाजारात जाणाऱ्या धान्यावर नियंत्रण राहील. या भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे व बिळूर तसेच बनाळी येथील स्वस्तधान्य दुकान काळाबाजार प्रकरणी पुरवठा अधिकारी व त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ अधिकारी यांना बडतर्फ करावे अशी मागणी ही कांबळे यांनी केली आहे.