आंवढीत ढगफुटीसदृष्य पाऊस,रस्ता गेला वाहून

आवंढी,वार्ताहर  : आवंढी ता.जत परिसरात रवीवारी रात्री झालेल्या धुव्वाधार पावसाने ढग फुटीची प्रचिती आली.या पावसाने आवंढीमध्ये थैमान घातले.गावाच्या दोन्ही बाजुंनी असलेल्या ओढ्यांना पुर आले.निम्म्या गावाचा संपर्क तुटला.ज्वारी,डाळींब,मका तसेच इतर सर्वच पिके गुडघाभर पाण्यात गेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाशीला आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावुन नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.रविवारी रात्री सातच्या सुमारास धुव्वाधार पावसाचे आगमन झाले.तब्बल दीड तास आलेल्या पावसाने रुद्ररुप धारण केले होते.प्रचंड वेगाने पडणार्‍या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले.डोंगर कपारी वरुन पावसाचे पाणी वाहत येवून  साखळी बंधारे तुडंब भरले.गुरुखी मधील एक माती नाला बांध फुटून त्याच्याच खाली असणारा तलाव ही मध्यभागी फुटला.तलावाखाली असणाऱ्या शेतकऱ्याचे शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गावाच्या दोन्ही बाजुने ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते.आवंढी लोहगाव रस्त्याची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या रस्त्यावर पुर्व पश्‍चिम असणार्‍या ओढ्याचे पाणी रस्त्यावरुन रात्रभर वाहत होते.मोठ्या प्रवाहामुळे पुलावरील रस्ता वाहून गेला होता.ग्रामपंचायतीकडून मुरूम टाकत रस्ता सुरू करण्यात आला. या जोरदार अतिवृष्टीमुळे अनेक घरे पडल्याने संसार उघड्यावर आले आहेत.
उभ्या ऊस,मका,द्राक्ष,डाळिंब बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच अण्णासाहेब कोडग,उपसरपंच अण्णासाहेब बाबर, माजी उपसरपंच प्रदीप कोडग यांनी केली आहे.


आंवढी-लोहगाव मार्गावरील रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे.