आरोग्याच्या सेवा उत्तम असल्यास,आरोग्य केंद्रे कोणत्याही प्रकारच्या संकटास लढा देतील ; पालकमंत्री जयंत पाटील

0






सांगली : कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्व किती आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे. आरोग्याच्या बाबतीत शासनाकडून कोणतीही तडजोड होणार नाही. आरोग्याच्या सेवा उत्तम असल्यास कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास आरोग्य केंद्रे चांगल्या प्रकारे लढू शकतील व प्रतिकार करू शकतील, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 







सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुष्मान भारत योजनेंतर्गत वॉर्ड क्र. 20 अंकली रोड मिरज येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोर्कापण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर गीता सुतार, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, महानगरपालिका विरोधी पक्षनेता उत्तम साखळकर, नगरसेवक सर्वश्री योगेंद्र थोरात, विष्णू माने, मैनुद्दीन बागवान, नगरसेविका नर्गिस सय्यद व स्वाती पारधी, माजी महापौर सुरेश पाटील, संजय बजाज यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.









ते पुढे म्हणाले, अंकली रोड मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील नागरिकांना मदतीचे ठरणार आहे. जिल्ह्यात जरी कोरोनाचे रूग्ण कमी होत असले तरी गाफील राहू नये. जगात अनेक देशामध्ये कोरानाचे रूग्ण कमी  झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालये अत्यंत चांगल्या दर्जाची करण्याबरोबर सर्व प्राथमिक शाळांची गुणवत्ता व दर्जा आणि सर्व साधने ही उत्तम दर्जाची करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. 






Rate Card




कुपवाडच्या ड्रेनेजचा प्रस्ताव व शेरीनाल्याचे काम याचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेत आढावा बैठक पुढील आठवड्यात घेण्याबरोबरच महानगरपालिकेच्या आणखी काही अडीअडचणी, समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ. सांगली शहराच्या जवळ चांगले औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी व शहरात येणारे रस्ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून घाट बांधणे व इतर मोठ्या प्रकल्पामध्येही लक्ष घालू असे ते म्हणाले. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी त्यांच्या प्रभागामध्ये प्रयत्नपूर्वक व पुढाकार घेऊन आरोग्य केंद्र, रस्ते व अन्य चांगली कामे केल्याचे कौतुक करून कोरोना काळात आशा वर्कर्स यांनी केलेल्या कामाचेही कौतुक त्यांनी यावेळी केले.








यावेळी महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, डॉ. रविंद्र ताटे, डॉ. अक्षय पाटील, डॉ. रेखा खरात, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार, पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे, स्वच्छता निरीक्षक व त्यांची टीम, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, शिक्षक यांचा कोरोना योध्दा म्हणून पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कमी कालावधीत चांगले काम केल्याबद्दल इंजिनिअर संजय खराडे व दिपक घोरपडे यांचाही सत्कार करण्यात आला. 









स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर हजारे यांनी तर आभार शहाजन तांबोळी यांनी मानले. या कार्यक्रमास महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशा वर्कर्स, नागरिक उपस्थित होते. 

या कार्यक्रमानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते मिरज येथील उदगाव वेस कब्रस्थान मध्ये नमाज शेड व वजुखाना कामाचे भूमिपूजन, महानगरपालिका दवाखान्यामधील प्रसुतीगृहाचे नुतनीकरण कामाचे भूमिपूजन, बाराईमाम दर्गा परिसरामध्ये सभा मंडप बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन व धनगर गल्ली येथील बिरोबा मंदिर सभागृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.






Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.