जत तालुक्यात 16 हजार हेक्टर शेतीला फटका | पंचनाम्यात वेळ न घालवता हेक्टरी 50 हजार मदत द्या ; सोमनिंग बोरामणी

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात अतिवृष्टीने खरीप हंगामातील 16 हजार 5 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.बाजरी, भुईमूग, तूर, सोयाबीन,ऊस, मका पिकांसह डाळिंब,द्राक्ष,भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.रब्बी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.यावर्षी जून महिन्यापासून पावसाने हजेरी लावली होती. रब्बी हंगामातील 75 हजार 517 हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली होती.
अनुकूल हवामानामुळे पिके चांगली आली होती.चांगले उत्पादन मिळेल,अशी आशा शेतकरी बाळगून होता.तालुक्यात 13 ते 15 ऑक्टोबर या कालावधित अतिवृष्टी झाली.चोवीस तासामध्ये 90 मिलिमीटर पाऊस झाला.हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. शेतजमिनी पिकांसह खरडून गेल्या आहेत.बांध व नाले फुटून माती वाहून गेली आहे.शेतातील उभ्या पिकात पाणी घुसले आहे.पिके रानातच कुजून गेली
आहेत.द्राक्ष,डाळिंब बागेत पाणी घुसले आहे.तालुक्यात कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 2 हजार 964 शेतकऱ्यांचे 16 हजार 5 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले आहे.सहा महिन्यात आमच्यावर दोनवेळा असे संकट आले आहे.एप्रिलमध्ये आलेल्या अवकाळीचेही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.कोरोनातून सावरत असताना पुन्हा अतिवृष्ठीना फटक्यात आम्ही संपतोय काय अशी भिती निर्माण झालो आहे.शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन,पंचनाम्यात वेळ न घालवता हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत करावी.

-सोमनिंग बोरामणी,शेतकरी, बेळोंडगी.