नाभिक समाजाला आर्थिक मदत द्या : राजू काशीद

सोन्याळ,वार्ताहर : कोवीड 19 या विषाणू आपत्तीमुळे संपूर्ण भारतात 24 मार्चपासून आजतागायत लॉकडाऊन आहे व भविष्यात कधीपर्यंत राहील, हे सांगता येत नाही. त्यामुळे सातत्याने दुकान बंद असल्यामुळे सलून व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडल्याने घरसंसार चालवणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे राज्यशासनाने सलून व्यावसायिकांना  भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी जत तालुका नाभिक समाज संघटनेचे माजी अध्यक्ष राजू काशीद (जाडरबोबलाद) यांनी केली आहे. 
जत तालुक्यातील सलून व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णता ठप्प आहेत. व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाची उपासमार होत आहे. शासन त्यांना व्यवसाय चालू करण्याची परवानगीही देत नसल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे? असा प्रश्न सलून व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक सलून व्यावसायिकांना प्रति महिना पाच हजार रुपये मदत द्यावी, तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवसाय चालू करण्याची परवानगी द्यावी,दुकानदारास पीपीई कीट व सॅनिटायझर त्याला परवडेल, अशा रेटमध्ये उपलब्ध करून द्यावे, पुढील सत्रात सलून व्यावसायिकांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आदी मागणी राजू काशीद यांनी शासनाकडे केली आहे.