सोन्याळ | शेळ्यांमेंढ्याचा बाजारासाठी परवानगी द्या | मेंढपाळांना विविध सुविधेसह आर्थिक मदत कराशेळ्यांमेंढ्याचा बाजारासाठी परवानगी द्या मेंढपाळांना विविध सुविधेसह आर्थिक मदत कराशेळ्यांमेंढ्याचा बाजारासाठी परवानगी द्या | मेंढपाळांना विविध सुविधेसह आर्थिक मदत करा

भंडारा जिल्ह्यात मेंढपाळ चारा ...
सोन्याळ,वार्ताहर ; कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या  लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनाच्या वस्तू, पदार्थ मिळविताना प्रत्येक मेंढपाळाला कसरत करावी लागत आहे.विशेष करून राज्यात लाखोंच्या घरात मेंढपाळ परिवाराची लोकसंख्या आहे.त्यांच्या दैनंदिन गरजासाठी लागणारे अन्न, पाणी आणि जनावरांसाठी चारा, पाणी , सुरक्षित निवारा मिळविताना त्यांना मोठे कष्ट आणि नुकसान सोसावे लागत आहे. मेंढ्यासह मेंढपाळांची उपासमार होत आहे. त्यामुळे भटकंतीत असणाऱ्या जत तालुक्यातील मेंढपाळांसह सर्वच मेंढपाळांना  विविध सुविधा,मर्यादित स्वरूपात शेळ्या-मेंढ्याचा बाजार भरवण्यासाठी परवानगी आणि कोरोना संपेपर्यंत दरमहा आर्थिक मदत देण्याची मागणी मेंढपाळातून होत आहे.
सांगली ,सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील  जत कवठेमहांकाळ,आटपाडी,खानापूर, माण,खटाव,सांगोला , मंगळवेढा,भुदरगड,गडहिंग्लज, शिरोळ आदी तालुक्यातील शेकडो मेंढके ( मेंढपाळ) आपल्या हजारो मेंढयासह भटकंती करीत जवळच्या,लांबच्या तालुक्यात,जिल्हयात मेंढ्या चराईसाठी गेले आहेत.पश्चिमेला कोल्हापूर, साताऱ्यापर्यंत आणि पूर्वेकडे सांगली  व  सोलापूर जिल्ह्यात या मेंढपाळाची भटकंती पिढ्यान पिढ्या चालु आहे. मराठवाडयातील मेंढपाळ पूणे सातारा परिसरात जा -ये करीत असतात .या भटकंतीत मेंढया,शेळ्या,कुत्री,एखादे घोडे,गाई आणि सोबत पत्नीसह परिवारातल्या एक-दोघांसह भटकंतीतील हे कुटुंब वाड्या,वस्त्या,रानोमाळ गावोगाव फिरत असते.सकाळी आठ वाजल्या पासून सायंकाळी 6 वाजेपर्यत उन्हातान्हात मेंढरे चारत पंधरा वीस किलोमीटरची पायपीट करताना या सर्वांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे राज्यात गेल्या दीड महिन्यापासून शेळ्या मेंढ्याचा बाजार बंद करण्यात आले आहे. विक्रीसाठी तयार झालेली करडे आणि मेंढ्या मेंढपाळाना बाजारपेठ अभावी विक्री करता येत नाही. जागेवरही  गिऱ्हाईक भेटत नाही.त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. हातात पैसे नसल्याने जनावरसह मेंढपाळांची उपासमार होत आहे.कोरोना महामारीच्या संकटाच्या स्थितीत अगतिक,गरीब,उपेक्षित मेंढपाळाना पुरेसे मास्क,सॅनिटायझर यांचे वाटप करून कोरोना संबधी दक्षतेचे आणि कायद्या संबधी माहीती सांगीतल्यास ते त्याचे निश्चित पालन करतील.मेंढपाळ,त्यांच्या मेंढ्याचा वावर बहुंताश वेळी रानोमाळच असल्याने त्यांना कोरोना बाबत दक्षता घेणे अडचणीचे ठरणार नाही.त्यामुळे त्यांना कोरोनाची सखोल मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. शिवाय या मेंढपाळ कुटुंबाना  किमान दहा हजार रुपये आर्थिक मदत आणि त्यांच्या मेंढ्याना दोन महिने पुरेल इतका मका,गहू,शेंगपेंड व ओला चारा उपलब्ध करून देवून शासनाने त्यांना आधार द्यावा.तसेच परगावी असणाऱ्या भटकंतीतल्या सर्वच मेंढपाळांची तातडीने माहीती गोळा करून त्यांना त्या त्या ठिकाणी किमान दोन महिने पुरेल इतका शिधा प्रत्येक आठवडयाला थोडा थोडा , वेगवेगळ्या भटकंतीच्या गावात उपलब्ध करून दिला जावा, दैनंदीन गरजेच्या वस्तू पुरवाव्यात. स्थानिक ग्रामपंचायत, जनतेला अथवा कर्मचाऱ्यांना सांगून त्या सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी,लॉकडाऊन संपेपर्यत मेंढपाळांशी मोबाईलवर संपर्क करून आठवड्यातून एकदा त्यांच्या फिरतीच्या ठिकाणी जावून त्यांना आरोग्य व्यवस्थेमार्फत आरोग्य सुविधांचा लाभ दिला जावा.यासाठी शासनस्तरावर तातडीने योग्य ती उपाययोजना करण्यात याव्यात अशीही मागणी मेंढपाळातून केली जात आहे. शिवाय याबाबत धनगर समाजातील युवा नेते विकास लेंगरे यांनी  मेंढपाळाना विविध सुविधा आणि आर्थिक मदत  शासनस्तरावरून निर्णय  होण्यासाठी जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देऊन विविध मागणी केली आहे.