तुकाराम बाबांच्या मदतीने गोंदियाच्या तरुणांना अश्रू अनावर

माडग्याळ,वार्ताहर : चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी कर्नाटकातून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदिया या गावी चालत जाणाऱ्या युवकांना मदतीचा हात दिला. आठ दिवस त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली एवढेच नव्हे तर त्या आठही तरुणाला गावी पोहचविण्यासाठी रितसर परवानगी काढली.परवानगी मिळताच त्यांना स्वखर्चाने लक्झरी गाडी देत गावी जाण्याची व्यवस्था केली. तुकाराम बाबांनी दाखवलेल्या या माणुसकीने लक्झरीत बसलेल्या तरुणांना हुंदका आवरला नाही. कर्नाटकात आम्हाला मालकाने हाकलले पण बाबांनी मदतीचा हात दिला असे सांगताना त्यांना रडू आवरले नाही.
त्याचे घडले असे, गोंदिया येथील आठ युवक कर्नाटक राज्यातील देशारहट्टी गावात बेदाणे मजूर कामास होते.  लॉक डाऊननंतर काम बंद झाल्यानंतर मालकाने त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांना वापरण्यासाठी दिलेला गॅस व अन्य साहित्य घेऊन जात मालकांनी ते राहत असलेल्या घराला कुलूप लावले. या आठही तरुणाचे अवघड झाले. त्यांनी चालत गाव गाठण्याचे ठरविले. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. वाटेत मिळेल ते मागून खात त्यांनी  पाच दिवस पायी प्रवास करत जत तालुक्यातील कोळगिरी गाठली.
कोळगिरी येथे हे आठही जण घरोघरी भाकरी मागून खात होते. शिव प्रतिष्ठानचे पाटील गुरुजी,  औदुंबर पोतदार यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी त्या तरुणांची चौकशी करून ही बाब तुकाराम बाबा महाराज यांच्या कानावर घातली.
तुकाराम बाबांनी ही माहिती कळताच बाबानी कोळगिरी गाठली व त्या सर्व तरुणांना संख येथे नेत त्याची मेडिकल तपासणी केली.  मेडिकल तपासणी झाल्यानंतर तुकाराम बाबा यांनी  या सर्वांची व्यवस्था आपल्या गोधळेवाडीच्या मठात केली. मागील आठ दिवसापासून त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय बाबांनी केली. दरम्यानच्या काळात या आठही जणांना गोदियाला जाता यावे यासाठी दोन्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. 
गुरुवारी परवानगी मिळताच त्या आठही तरुणाला गावी जाण्यासाठी तुकाराम बाबा यांनी लक्झरी गाडीची व्यवस्था करून दिली.

गावी जाण्याची परवानगी मिळाली आहे, लक्झरी गाडी ची व्यवस्था तुकाराम बाबा यांनी केल्याचे कळताच त्या आठही तरुणांचा आनंद गगनात मावेना. आपल्या गावी आपण जाणार या नुसत्या कल्पनेने त्यांना आकाश ठेंगणे झाले. गाडीत बसताना त्यांना आनंदाश्रू तर आवरत नव्हतेच पण त्याच बरोबर तुकाराम बाबा यांनी आठ दिवसापासून जी व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचे आभार मानताना त्यांना रडू कोसळले. मालकांनी आम्हाला हाकलून दिले पण तुकाराम बाबांनी निस्वार्थपणे आम्हाला आधार दिला. तुकाराम बाबा देव माणूस आम्हाला या कठीण काळात धावून आल्याचे सांगताना सर्व परिसर भावुक झाला. 

सामाजिक बांधिलगी कायम जपणार

तुकाराम बाबा महाराज जतकरांच्या मदतीसाठी आपण  सतत सज्ज आहोत.जत तालुक्यात जर कुणीअशा पध्दतीने जर कुणी अडकून पडले असेल तर त्यासाठी आपणाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी केले आहे.
Attachments area