विवाहित महिलेचा गळफास घेऊन आत्महत्या

जत,प्रतिनिधी : जत शहरात राहणार्‍या एका परप्रांतीय विवाहित महिलेने घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमा भरत ढोली (मुळ रा.नेपाळ,सध्या महाजन गल्ली) असे मृताचे नाव असून शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत जत पोलिस ठाण्यात पती भरत ढोली याने फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या सहा महिन्यापूर्वी सीमा व भरत यांचा प्रेम विवाह झाला होता. दोन महिन्यापूर्वी ते जतमध्ये राहण्यास आले होते. भरत शहरातील एका हाॅटेलमध्ये वेटरची नोकरी करत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हाॅटेलमधील काम आटपून घरी गेला. तर पत्नी सीमा ही दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. भरत याने तात्काळ जत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून याची नोंद केली आहे. याचा अधिक तपास पोलिस शिंदे करत आहेत.