पोलिस हवालदार सुधाकर गिरीबुवा अपघातात मृत्यू
जत,प्रतिनिधी :  बिळूर ता.जत येथील मात्र सध्या मुंबई ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस हवालदार सुधाकर लक्ष्मण गिरीबुवा (वय 50) यांचा सेवा बजावून घरी परत जात असताना अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी दि.8 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. आज रविवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.बिळूर ग्रामस्थांनी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुधाकर गिरीबुवा हे सन 1990 पासून सेवेत कार्यरत आहेत. सुरूवातीला एस. आर.पी दलात दाखल झाले. यानंतर काही वर्षातच मुंबई पोलिस दलात दाखल झाले. मुंबई येथील ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात ते रूजू आहेत. शनिवारी रात्री उशिरा आपली सेवा बजावून दुचाकीवरून घरी परत जात असताना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह जत तालुक्यातील बिळूर गावी आणण्यात आला. सांगलीच्या विशेष पोलिस पथकाने त्यांना शासकीय मानवंदना दिली. यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी,असा परिवार आहे