जत तालुक्यात अवैध धंद्यांना राजाश्रयचं | यंत्रणाच गुंतली : जुगार,मटका,दारू, गुटख्याची खुलेआम विक्री; कठोर कारवाईची गरज






जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह गावागावात खुलेआम मटका,जुगार, दारू, गुटख्याची विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत आहे. मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात अवैध धंद्यांना लगाम बसला होता. त्यामुळे तालुक्यात अपवादानेच बेकायदा धंदे सुरू असल्याचे दिसून येत होते. मात्र वर्षभरापासून तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे.जत शहरासह तालुकाभरात बेकायदा धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे. उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गावात काही टपऱ्यांवर खुलेआमपणे दारूची विक्री होत आहे. शहराबरोबरच इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवरदेखील खुलेआमपणे बेकायदा दारूची विक्री होत आहे. काही गावात बेकायदा दारूविक्रेत्यांनीही जत शहरात चांगलेच बस्तान बसवल्याचेही चित्र आहे. बेकायदा दारू विक्रीबरोबरच तालुक्यात गुटखा, पेट्रोलचीही बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. अनेक गावांत काही पानटपऱ्या,दुकानांतून पेट्रोल, गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू, पेट्रोल आणि गुटख्याच्या विक्रीचे दरही बेकायदेशीर आहेत.
दीडपट ते दुप्पट दराने याची खुलेआमपणे विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे सुरु असताना कारवाई झाल्याचे चित्र कोठेचे दिसून येत नाही. संबंधित गावची जबाबदारी असणाऱ्या बीट अंमलदारांना, बेकायदा धंद्यांची माहिती असूनदेखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पोलिस विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील अवैद्य धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याने चित्र आहे.
काही पोलिसांची चिरमिरीची वृत्तीच याला कारणीभूत असल्याची चर्चा असून, काही पोलिस कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वरकमाईत गुंतलेले दिसतात. एखाद्या महिन्याला एखाद्याची वारी चुकली, तर दुसऱ्या महिन्यात दहा हजार रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा आहे. एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरात अवैध व्यवसाय जोमात असल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.



महिन्याला पाच हजार रुपये
गावा-गावात अनेक ठिकाणी बेकायदा दारु विक्री सुरु आहे. या ठिकाणांची आणि सर्वच बेकायदा अड्ड्यांची माहिती खाकीतील काही कारभाऱ्यांना आहे. अशाच एका खाकीवाल्याकडून प्रत्येक महिन्याला न चुकता दारु विक्रेत्यांकडून एक ते पाच हजार रुपयांचा मलिदा बेकायदा घेतला जातो. पोलिस ठाण्याच्या आवारापासून लांब अंतरावर असे व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.